सावरगाव (दाभाडे), ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील तरुण शेतकरी अंकित उद्धव दाभाडे यांनी दुष्काळी परिस्थितीतही आधुनिक शेतीचा अवलंब करून यश मिळवले आहे. त्यांच्या शेतातील केळी पहिल्यांदाच इराण देशात एक्सपोर्ट झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
अंकित दाभाडे यांनी 5000 टिशू कल्चर रोपांची सुमारे अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली होती. योग्य नियोजन, दर्जेदार लागवड, वेळेवर व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे उच्च दर्जाची केळी उत्पादनात आली. या यशामागे बाप्पू मयूरराव तायडे (बोदवड) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सोयाबीन पिकाला मिळणारा कमी भाव लक्षात घेता शेतीमध्ये बदल करत केळी लागवडीचा निर्णय घेतला. ही केळी जय गजानन केला सप्लायर्स, धामोडी-कांडवेल, ता. रावेर येथील प्रा. प्रा. विकी जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून इराण देशात पाठवण्यात आली. सावरगाव गावातून व तालुक्यातून पहिल्यांदाच केळी एक्सपोर्ट झाल्याने हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
शिक्षणासोबत शेतीला वेळ देत आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास दुष्काळी भागातही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठता येते, हे या यशातून सिद्ध झाले आहे.




