केवळ २५ दिवसांची ‘शॉर्ट-टर्म’ लढाई!
धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच चार वर्षांपासून साचलेलं राजकीय पाणी आता खळखळू लागलं आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने, अवघ्या २५ दिवसांत धारूरकरांना आपला नवा ‘शहेनशहा’ निवडायचा आहे. या कमी वेळेत उमेदवारांची निवड, प्रचाराची रणनीती आणि पक्षबांधणी यामुळे राजकीय पक्षांची चांगलीच ‘धांदल’ उडाली आहे.
‘राष्ट्रवादी-शरद पवार’ गटाची ‘अर्जुन’ झेप: शहरातील प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी थेट नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार अर्जुनराव गायकवाड यांचे नाव जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी तरुणांना प्राधान्य देत प्रत्येक प्रभागात उमेदवारी निश्चित केल्याची चर्चा आहे.
भाजपचा ‘सस्पेन्स’ कधी संपणार? २०१६ मध्ये सत्ता काबीज करणाऱ्या भाजपमध्ये मात्र अजूनही शांतता आहे. मतदान तोंडावर आले तरी उमेदवाराचा पत्ता नाही. नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सर्वसाधारण असल्याने बालाजी चव्हाण यांचे नाव चर्चेत असले तरी, पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाची धारूरला प्रतीक्षा आहे.
राष्ट्रवादीतील ‘डॉक्टर-इंजिनियर’ जुगलबंदी: इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये डॉ. बालाभाऊ जाधव, डॉ. मयूर सावंत आणि नितीन शिनगारे यांसारख्या मोठ्या नावांवर चर्चा सुरू आहे. तिघांपैकी कोणाच्या गळ्यात ‘तिकिटांची माळ’ पडते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.
काँग्रेसला ‘एक्झिट’चा झटका: एकेकाळी काँग्रेसमध्ये वर्चस्व गाजवणारे प्रभाकर चव्हाण आणि माजी नगर उपाध्यक्ष खुरेशी यांच्यासह अनेकजण राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेसला मोठा ‘पॉलिटिकल शॉक’ बसला आहे. या धक्क्यातून सावरत तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर रंदवे यांनी मात्र ‘स्वतंत्र लढाई’ची घोषणा केली आहे.
अपक्षांचा ‘गवळी’ पॅटर्न: अपक्ष उमेदवार म्हणून सुरेश गवळी यांनीही नगर परिषदेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली असून, त्यांनी काही प्रभागांमधील उमेदवारांना निश्चित केले आहे.
मुद्दे हेच ‘किंग’: पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, घनकचरा आणि आवास योजना हेच धारूरच्या निवडणुकीचे प्रमुख आणि ‘हटके’ मुद्दे असणार आहेत. यंदा चार वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीमुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असून, शहराच्या विकासाची दिशा कोण ठरवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




