प्रतिनिधी – बुलढाणा बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला आता गती आली आहे.. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक त्यांच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात आली.. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..
सैलानी बाबा यात्रा महोत्सव २५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.. यात्रेदरम्यान विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.. २ मार्च २०२६ रोजी नारळाची होळी पेटविण्यात येणार असून, त्यानंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.. ८ मार्च २०२६ रोजी संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे.. ही मिरवणूक पिंपळगाव सराई येथून मुजावर परिवाराच्या संदल घरातून रात्री ८ वाजता निघून गावातील प्रमुख मार्गांवरून परिक्रमा करत सुमारे ४ किमी अंतर पार करून रात्री १२ वाजता सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचेल.. १२ मार्च २०२६ रोजी फातेखानी कार्यक्रमानंतर सैलानी बाबा ट्रस्टकडून प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होईल..
सैलानी बाबा दर्गा हे सर्व जाती-धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने यात्रेत बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.. यंदा अंदाजे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.. ही यात्रा शांततामय, सुरक्षित अंक सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे ..




