आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा सत्कार केला. भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट टीमचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी 2 कोटी 25 लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22 लाख 50 हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी 11 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विश्वचषकात भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. या विजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने केलेली पुनरागमनाची कामगिरी उल्लेखनीय आहे.




